Thursday, 26 October 2017

weight lost after diwali celebration in Marathi

दिवाळीत फराळावर आणि गोडावर ताव मारलाय?, उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त टीप्स*
_दिवाळीमध्ये असणारी सुटी, एकमेकांना केलेला आग्रह, गोडाधोडाचे पदार्थ आणि एकमेकांसोबत बसल्याने जास्तीचे गेलेले चार घास यामुळे तुमचे वजन वाढले नसेल तरच नवल. तर अशाप्रकारे तुम्ही खाऊन सुस्त झाला असाल आणि आता त्याचा आपल्याला त्रास होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर काही उपाय आवर्जून करा. पाहूयात काय आहेत हे उपाय…_
*लिंबू*
तुम्हाला पोट जड झाल्याचे जाणवत असेल. या समस्येवर लिंबू हा अतिशय उत्तम पर्याय आहे. लिंबातील विशिष्ट प्रकारच्या आम्लामुळे पोट जड आणि फुगल्याच्या समस्येपासून तुम्हाला लवकर सुटकारा मिळू शकतो. यातही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
*मध*
मध हा आयुर्वेदातील एक अतिशय उत्तम पदार्थ आहे. मधामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्यास चयापचय क्रिया चांगली होण्यास मदत होते. पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास त्याचाही शरीराला चांगला फायदा होतो. मधामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते.
*पाणी*
शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्वे मिळावीत यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचे काम करते. शरीरातील अतिरिक्त साखर आणि फॅटस कमी होण्यासाठी पाणी पिण्याचा फायदा होतो. मात्र दररोज पाणी पिण्यातही संतुलन असणे आवश्यक आहे. दररोज कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ४ लिटर पाणी प्यायला हवे.
*पालक*
सणावारांच्या दिवसात जास्त फॅटस असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. हे फॅटस घटावेत यासाठी शरीराला फायबरची आवश्यकता असते. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे या काळात आपल्या शरीराला फायबरची आवश्यकता असते. शरीराला वेळीच योग्य प्रमाणात फायबर न मिळाल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे पालकाचा आहारात आवर्जून समावेश करावा.
*ग्रीन टी*
सणावारांच्या दिवसातून बाहेर येत नियमित अन्न खाण्यास सुरुवात केल्यावरच ग्रीन टीचा खरा फायदा होतो. ग्रीन टीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
*काकडी*
काकडीमुळे लघवी लागते. जास्त वेळा लघवी झाल्यास शरीर साफ होण्यास मदत होते. त्यामुळे आपण खालेल्या तेलकट, मसालेदार आणि गोड पदार्थांतील अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे सणावारांनंतर काकडीचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते.